ममतादीदींचे ४० आमदार तृणमूल काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश करतील : नरेंद्र मोदी यांचा गौप्यस्फोट

पश्चिम बंगालमधील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतादीदींचे ४० आमदार तृणमूल काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट केला आहे. मोदी यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील सेरमपूर येथील सभेत बोलत होते. यावेळी बोलताना मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक आमदार तृणमूल काँग्रेस पक्षाला रामराम करतील. आजही ४० आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. दीदी, तुमचं वाचणं कठीण आहे, कारण तुम्ही विश्वासघात केलाय, अशा शब्दात मोदींनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला.
दगड-माती पासून बनवलेले रसगुल्ले मोदींना खाऊ घालायचे आहेत, असं ममता बॅनर्जी काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. त्यावर बोलताना मोदी म्हणाले की, वाह.. माझे हे सौभाग्यच आहे. ज्या मातीवर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, चैतन्य महाप्रभू, नेताजी सुभाष चंद्र बोस, श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या महापुरुषांचा जन्म झालेल्या मातीतील रसगुल्ले म्हणजे माझ्यासाठी प्रसादच आहे.