देशाला मूर्ख बनवण्याचं काम अमित शाह आणि नरेंद्र मोदी करीत आहेत : राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतं मागत आहेत, शहिदांच्या नावावर मतं मागत आहेत. मात्र या भाजपा-सेनेच्या सरकारला कोणत्या निकषांवर मतं द्यायची? यांनी दिलेली सगळी फोल ठरली. सगळे निर्णय फसले. एकट्या महाराष्ट्रात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यांच्या काळात २०१६ पर्यंत ३८ हजार बलात्कार झाल्याची नोंद आहे. त्यानंतर या नोंदीच बंद करण्यात आल्या. मीडियाची मुस्कटदाबी करण्याची सुरूवात मोदींनी केली. मोदींनी काळा पैसा भारतात आणतो आणि ते पैसे तुमच्या सर्वांच्या, नियमित टॅक्स भरणाऱ्या नोकरदारांच्या बँक खात्यात टाकतो, असे म्हटल्याचा व्हिडीओ राज यांनी दाखवला. तसेच, कसं तुम्हाला मूर्ख बनवलं, अहो मलाही मुर्ख बनवलं, असे म्हणत राज यांनी पश्चातापाची भावना नाशिकमधील सभेत व्यक्त केली.
आता कोणत्याही बातम्या ते बाहेर येऊ देत नाहीत अशीही टीका राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेत केली.एचएल या कंपनीची क्षमता असतानाही फक्त मैत्री जपण्यासाठी अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलसंदर्भातलं कंत्राट देण्यात आलं असाही आरोप राज ठाकरेंनी केला. तसंच एचएएल आणि जेट या कंपन्या डबघाईला आणण्याचं काम या सरकारने केलं. याच सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव देऊ असं आश्वासन दिलं होतं, बेरोजगारी हटवण्यात येईल. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, काळा पैसा भारतात आणू, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू ही आणि अशी अनेक स्वप्नं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवली होती. मात्र यातलं एकही स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं नाही. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही.
काँग्रेसच्या काळात टू जी घोटाळा प्रकरणी ए राजा, कनिमोळी यांच्यासह अनेकांना तुरुंगात धाडलं होतं. ते सगळे भाजपाच्या काळात कसे सुटले ? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावर टीका होते असे वक्तव्य नरेंद्र मोदींनी केली होती. तुम्ही हे काय बोलत आहात? प्रश्न विचारल्यावर तुम्हाला जात आठवते का? असेही प्रश्न राज ठाकरेंनी विचारले. सगळी खोटी आश्वासनं देणाऱ्या आणि खोटं बोलणाऱ्या मोदींना कोणत्या निकषांवर मतं द्यायची? असा प्रश्न राज ठाकरेंनी पुन्हा एकदा विचारला.
गांधी परिवारातल्या सदस्यांनी भ्रष्टाचार केला. रॉबर्ट वढेराला तुरूंगात टाकण्याची भाषा भाजपाच्या नेत्यांनी २०१४ च्या आधी केली होती. आता मात्र या कोणत्याही गोष्टींचा उल्लेखही मोदी करत नाहीत. रॉबर्ट वढेरा यांच्या अटकेबाबत अमित शाह यांनी काय म्हटलं होतं त्याचीही क्लिप राज ठाकरेंनी दाखवली आणि देशाला हे लोक कसे मूर्ख बनवतात ते पहा असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी काय आश्वासनं दिली होती? आणि अमित शाह म्हटले होते की पंधरा लाख रूपये हा जुमला आहे ती क्लिपही या भाषणात राज ठाकरेंनी दाखवली. देशाला मूर्ख बनवण्याचं काम अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.