ऑनर किलिंग : आंतरजातीय विवाह केल्याने मुलीला ठार मारून मृतदेहाची विल्हेवाट

मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने आई -वडिलांनी मुलीला ठार मारुन तिचा मतदेह जाळून टाकल्याचा प्रकार नेवाशातील कौठा गावात घडला आहे. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध सोनई पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रतिभा कोठावले असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा पती देवेंद्र कोठावले राहणार संगमनेर याच्या फिर्यादीवरून मुलीचे वडील ब्रह्मदेव रमाजी मरकड व आई आशा या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोघांनी २४ दिवसांपूर्वीच लग्न केले होते. देवेंद्र कोठावले हा मेडिकल रिप्रेझिटिव्ह म्हणून काम करतो. तर मुलगी प्रतिभा मरकड ही मेडिकल दुकानात नोकरी करत होती. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मुलगा परजातीचा असल्याने मुलीच्या घरच्यांनी लग्नास विरोध केला होता. दोघांशी पळून जाऊन संगमनेरमधील एका मंदिरात विवाह केला होता. १ एप्रिल रोजी हा विवाह झाला होता. २४ एप्रिल रोजी प्रतिभा हिला आई- वडिलांनी संपर्क करून देवेंद्र यांच्याशी पुन्हा लग्न करून देऊ, असे सांगून गावाकडे बोलवून घेतले होते. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.
पत्नीचा मोबाइलवर पती देवेंद्रने संपर्क साधला पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर देवेंद्र व त्याच्या मित्राने मुलीचे गाव गाठले. त्यावेळी मरकड यांनी मुलीचा हार्ट अटकने निधन झाले आहे. घरीच अंत्यविधी केला, असे सांगितले. मात्र पत्नीची हत्या केली आहे, असा दावा देवेंद्रने करताच ब्रह्मदेव मरकड याने त्याला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर देवेंद्रने सोनई पोलिस स्टेशनमध्ये जावून फिर्याद नोंदवली.