श्रीलंकेच्या पूर्व प्रांतातल्या अंबारईत झाले पुन्हा तीन बॉम्बस्फोट

श्रीलंकेच्या पूर्व प्रांतातल्या अंबारईत तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. अंबारईच्या साइंदमरदू भागात काही जणांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी दिली. एका संशयितानं कलमुनाईत एका इमारतीत बॉम्बस्फोट घडवला. मात्र हा आत्मघाती हल्ला होता का, याची माहिती अद्याप श्रीलंकन सरकारकडून देण्यात आलेली नाही.
साइंदमरदूमध्ये सुरक्षा दलावर गोळीबार झाल्यानंतर, बॉम्बस्फोटाच्या आवाजानं परिसर हादरल्यानंतर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटांचा प्रमुख सूत्रधार असलेल्या जहरान हाशिमच्या कट्टाकुंडी गावातील प्रत्येक घरात जाऊन पोलीस तपास करत आहेत. या दरम्यान पोलिसांनी बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी स्फोटकं ताब्यात घेतली. यावेळी पोलिसांना आयसिसचा बॅनर आणि पोशाखदेखील सापडला. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तीन बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी सर्वच भागातील सुरक्षा वाढवली आहे. पहाटे 4 पर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.