PNB SCAM : लंडन कोर्टाने निरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला

पीएनबी बँकेचे १३ हजार कोटी रुपये घेऊन देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्याचबरोबर त्याच्या पोलीस कोठडीत २४ मे पर्यंत वाढ करण्यात आली असून त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. यापूर्वी २९ मार्च रोजीही लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने त्याचा जामीन फेटाळून लावला होता.
नीवर मोदीला आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश एम्मा अर्बथनॉट यांनी मोदीचा जामीन फेटाळताना त्याच्या कोठडीत वाढ केली आहे.
दरम्यान, ईडीने मोदीचा मामा मेहुल चोक्सीच्या जप्त केलेल्या १२ कारचा लिलाव केला आहे. त्यातून ईडीला ३.२९ कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्यावर्षी जानेवारीत पीएनबी घोटाळा उघड झाला होता. त्यापूर्वीच मोदीने भारतातून पलायन केलं होतं. पीएनबीच्या काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने त्याने बँकेला १३ हजार कोटी रुपयांना ठकवले होते.