ढोंगी आणि भंपक मोदी सरकार गाडा : राज ठाकरे यांचे मतदारांना जाहीर आवाहन

आज राज यांनी लावला मोदींच्या जन्म गावाचा व्हिडीओ शो…
गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ आश्वासने देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे. राजीव गांधींच्यानंतर ऐतिहासिक बहुमत नरेंद्र मोदींनी मिळाले , पण यांनी देशाचे वाटोळे केले . मोदींच्या काळात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रस्त्यावर येऊन लोकशाही धोक्यात आली आहे म्हणून सांगू लागले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राजीनामे देऊन निघून गेले, सीबीआयमध्ये बंडाळी माजली. ही आणीबाणीची पायरी आहे. हुकूमशाहीची ही सुरुवात आहे. त्यामुळे हे ढोंगी आणि भंपक सरकार गाडा, असं आवाहन राज यांनी केलं.
मुंबईवरील पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले जवान माझ्या शापाने मारल्या गेल्याची मुक्ताफळे उधळणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंहला लोकसभेची उमेदवारी का दिली? असा सवाल करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा साध्वीच्या वक्तव्याचं समर्थन करतात. देशातील पोलिसांबद्दल त्यांना काहीच वाटत नाही. निर्ढावलेपणाने हे लोक त्याचं समर्थन करतात. हा सत्तेचा माज आहे, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला.
निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी मुंबईतील अभ्युदयनगर-काळाचौकी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर शरसंधान साधल्यानंतर राज ठाकरे यांची तोफ आज पुन्हा धडाडली. भांडूप पश्चिमेच्या जंगलमंगल रोडवरील खडी मशीन येथील सभेतून पुन्हा एकदा राज यांनी मोदी-शहांवर जोरदार हल्ला चढवला. हेमंत करकरे, कामटे, तुकाराम ओंबळे, साळसकर हे पोलीस अधिकारी पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. त्यावर माझ्याच शापाने हे पोलीस अधिकारी मारल्या गेल्याची मुक्ताफळे प्रज्ञासिंह ठाकूरने उधळले. त्याचं समर्थन मोदी आणि शहा करतात. त्यांना निवडणुकीचं तिकीट देतात. त्यांना देशातील पोलिसांबद्दल काहीच वाटत नाही. निर्ढावलेपणाने ते त्याचं समर्थन करत आहेत. आता मात्र साध्वीचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही, असं भाजपवाले सांगत आहेत. मग साध्वीला उमेदवारी का दिलीत? सिग्नल तोडल्यामुळं काही त्या बाईला अटक करण्यात आली नव्हती. ती बॉम्बस्फोटाची केस होती, असं सांगतानाच दहशतवाद हा दहशतवाद असतो. त्याला कुठला धर्म नसतो. मरणारी माणसं कोणत्या धर्माची आहेत हे बॉम्बला माहीत नसतं, असा हल्ला राज यांनी चढवला.
आज मोदींच्या जन्म गावाचा लावला राज यांनी व्हिडीओशो…
मोदींनी खासदार ग्रामीण योजनेतून दत्तक घेतलेल्या गावाची पोलखोल केल्यानंतर राज यांनी मोदींच्या गुजरातमधील जन्मगावाचाही एका व्हिडिओच्या माध्यमातून पर्दाफाश केला. मोदींच्या गावात शौचालये नाहीत. तिथल्या मुली उघड्यावर शौचालयाला जातात आणि बाहेर स्वच्छता अभियानावर मोदी बोलत असतात. हा माणूस जिथून आला तिथली परिस्थिती अशी असेल तर देशाची काय परिस्थिती असेल हे लक्षात घ्या, असं ते म्हणाले. आठवडाभरात साडे आठ लाख म्हणजे मिनिटाला ८४ आणि सेकंदाला ७ शौचालये बांधल्याच्या थापा मारणाऱ्या मोदींनी बहुमत मिळूनही पाच वर्ष केवळ पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींना शिव्या घालण्यात घालवली, अशी टीकाही त्यांनी केली. आजची राज यांची सभाही त्यांच्या धारदार वक्तव्यामुळे गाजली.