काॅंग्रेसचे चर्चित नेते राधाकृष्ण विखे-पाटील आज आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता

लोकसभा निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहिलेले काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे गुरुवारी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेसचा प्रचार करायचा की शिवसेना-भाजप युतीचा याचा फैसला ते करणार आहेत.
दरम्यान, ‘विखे यांनी बुधवारी श्रीरामपूरमध्ये समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी कार्यकर्त्याची बाजू समजून घेतली. राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश केल्यापासून विखे हे काँग्रेसपासून दूर गेले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारात ते जिल्ह्यात आणि राज्यात फिरकले नाहीत. उलट नगरमध्ये तळ ठोकून मुलाचा प्रचार केला. नगरची निवडणूक संपल्याने शिर्डी लोकसभेसाठी कॉंग्रेसचा प्रचार करायचा का? इतर कोणाचा, याचा निर्णय गुरुवारी राधाकृष्ण विखे जाहीर करणार आहेत.
दरम्यान, विखे यांचे पक्षांतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात गुरुवारी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण तर उद्या शुक्रवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची संगमनेर येथे सभा आयोजित केली आहे. या दोन्ही सभांना राधाकृष्ण विखे हजर राहणार का? या कडेही राज्याचे लक्ष लागले आहे.