प्रियांका गांधी नरेंद्र मोदींच्या विरोधात लढणार नाहीत ; अजय राय काँग्रेसचे उमेदवार

काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची अजून एक यादी जाहीर केली असून या यादीत वाराणसी आणि गोरखपूरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. वाराणसीहून काँग्रेसने अजय राय यांना तिकीट दिलं असून यासोबतच प्रियांका गांधी –वाड्रा मोदींविरोधात निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. २०१९मध्ये पुन्हा एकदा प्रियांका गांधी वाराणसीहून निवडणूक लढवण्याची चर्चा जोर धारायला लागली होती. पक्षाध्यक्षांनी सांगितलं तर निश्चित वाराणसीहून निवडणूक लढवेन अशी भावना प्रियांका गांधींनी व्यक्त केली होती. पण स्थानिक राजकीय परिस्थिती पाहता प्रियांका गांधी ही निवडणूक जिंकणे अवघड असल्याचे पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आले. त्यामुळे अजय राय यांना वाराणसीहून उमेदवारी देण्यात आली असल्याचं समजतं. अजय राय यांनी २००९मध्ये देखील वाराणसीहून निवडणूक लढवली होती.
आता वाराणसीची निवडणूक नरेंद्र मोदींसाठी सोपी झाल्याचं बोललं जात आहे. १९ मेला वाराणसीला मतदान होणार असून २३ मेला सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकांसाठी पूर्वांचलमध्ये काँग्रेसचा प्रचार करण्याची जबाबदारी प्रियांका गांधींवर सोपवण्यात आली होती. गंगा यात्रा करत प्रचाराची सुरुवात करणाऱ्या प्रियांका गांधींना स्थानिक जनतेने खूप चांगाला प्रतिसाद दिला. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधींना पाहिल्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आठवण येते अशी भावना व्यक्त केली. त्यातच प्रियांका गांधींनी वाराणसीहून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवावी अशी मागणी जोर धरायला लागली आहे. २०१४मध्ये वाराणसीहून प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदी विजयी झाले होते. त्यावेळी आप अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. प्रियांका गांधींनीही २०१४मध्ये वाराणसीहून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण काँग्रेसबद्दलचा लोकांच्या मनातील रोष पाहता तेव्हा प्रियांका गांधींना तिकीट देण्यात आलं नव्हतं.