राजीनामा मंजूर करीत राहुल गांधी यांनी अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांना केले कार्यमुक्त

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे आपल्या विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधीं यांनी अखेर त्यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना पक्षातून मुक्त केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर या वृत्तामुळे पडदा पडला आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी संगमनेरला सभा आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ . सुजय याला काँग्रेसने तिकीट न नाकारल्याने त्याने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि हि निवडणूक पारही पडली . पुत्रप्रेमामुळे राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच अडचणीत आले होते . परिणामी विखे पाटील आपल्या पदाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सोपविला होता. मुलाचा प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर सातत्याने करण्यात येत होता. परंतु पक्षाकडून त्यांच्या विरोधात कुठलीही भूमिका न घेतल्याने संशय निर्माण झाला होता अखेर त्यांना पक्षातून मुक्त करण्यात आल्याने त्यांचे पक्षांतर्गत विरोधक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना आता फ्री हॅन्ड मिळणार आहे एवढे मात्र नक्की.
काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीरामपूरमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीनंतर आज ससाणे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली. आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून अद्याप काँग्रेस पक्ष सोडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरची निवडणूक संपल्यानंतर विरोधी पक्ष नेते विखे यांनी शिर्डी मतदारसंघात लक्ष घालायला सुरवात केली आहे.
डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी विखेंसोबत जाण्याची भूमिका घेतल्याने त्यांना पदावरून दूर करीत ससाणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये माजी मंत्री थोरात यांचा पुढाकार होता. ससाणे मूळचे विखे सर्मथक असले तरी त्यांची नियुक्ती थोरातांच्या पुढाकारातून झाली होती. त्यानंतर ते पक्षात आणि आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारात सक्रीय झाले होते. मात्र, कांबळे यांच्याच एका वक्तव्यामुळे नाराजी झाल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विखे यांनी आपली भूमिका अद्यापही गुलदस्त्यात ठेवली आहे. यासंबंधी त्यांना पत्रकारांनी विचारले असता आपण शनिवारी बोलू, असे ते म्हणाले आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीरामपूरला युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी प्रचार सभा घेण्यासाठी येत आहे. त्यामुळे आता शनिवारी ससाणे आणि विखे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.