पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसण्यापासून रोखा, २०१४ च्या चुकीची पुनरावृत्ती करू नका : प्रकाश आंबेडकर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसण्यापासून रोखावे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय सुखदान यांच्या प्रचारासाठी कोपरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर गुरुवारी आयोजित जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते. उमेदवार संजय सुखदान, वंचित बहुजन आघाडीचे नेते मोठ्या संखेने उपस्थित होते.
अॅड. आंबेडकर म्हणाले, मागील तीन वेळा काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीचे उमेदवार शिर्डी मतदारसंघात निवडून आले नाहीत. रामदास आठवले यांचा पराभव देखील यांनीच केला. असे सांगून राजकारणातील पळपुटेपणा राहुल गांधी बारामतीतून शिकले की काय? अशी कोपरखळीही त्यांनी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदी व नोटा बदलीचा निर्णय देशातील काळ्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारा ठरला. प्रत्येक गोष्टीला जसा अंत असतो, तसाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील राजकीय अंत होणार आहे. त्यांना लवकरच ‘अलविदा……मोदी’ असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. इथल्या सुशिक्षित, अनुभवी व जाणकार लोकांनी स्वत:वर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. ही लोकसभा निवडणूक म्हणजे गेल्यावेळी केलेली चूक दुरुस्त करण्याची नामी संधी आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.