‘ विरोधक आधी माझ्यावर टीका करत होते, आता त्यांनी ईव्हीएमवर टीका करण्यास सुरुवात केली आहे : नरेंद्र मोदी

‘आधी विरोधक माझ्यावर टीका करत होते, पण कालपासून त्यांनी ईव्हीएमवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. असं दिसतंय की पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचं त्यांनी ठरवलं आहे. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी परिक्षेत पेपर चांगला गेला नाही तर पेन नीट चालत नव्हता वैगेरे अशी कारण देतो अगदी त्याप्रमाणे’, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. झारखंडमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
यावेळी नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत 2014 लोकसभा निवडणुकीआधी भारतातही हेच सुरु होतं अशी टीका केली आहे. नरेंद्र मोदींनी श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत म्हटले की, ‘श्रीलंकेत दहशतवाद्यांनी चर्च आणि इतर ठिकाणी कशाप्रकारे दहशतवादी हल्ला केला हे तुम्ही पाहिले असेल. 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतदेखील त्याच परिस्थितीतून जात होता’. या चौकीदाराने पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. आम्ही घरात घुसून दहशतवाद्यांना मारलं आहे. आज प्रत्येक दहशतवाद्याच्या मनात भीती आहे की आपण काही चूक केली तर मोदी आहे असं त्यांनी सांगितलं.
काँग्रेस आणि त्यांच्या महाभेसळ सहकाऱ्यांची दहशतवादासंबंधी काय भूमिका आहे हे लक्षात ठेवा असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. हे लोक पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या आपल्या वीर जवानांवर शंका उपस्थित करत आहेत. ते म्हणत आहेत पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला याचा पुरावा द्या. ते आपल्या जवानांच्या शौर्यावर शंका घेत आहेत असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. काँग्रेसला देशाच्या सेवा करण्यासाठी सरकार नको आहे. ते फक्त एका कुटुंबाचा विचार करतात आणि त्यांच्यासाठी समर्पित करण्यात आलं आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला. झारखंडमध्ये तुम्हीही अनुभव घेत असाल की ज्या ठिकाणी लोक सूर्यास्तानंतर बाहेर पडण्यास घाबरायचे तिथे आता परिस्थिती बदलत आहे असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.