उदित राज यांची भाजपला सोडचिठ्ठी; काॅंग्रेसमध्ये प्रवेश

भाजपचे वायव्य दिल्लीचे खासदार उदित राज यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं ते नाराज होते. अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उदित राज हे मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, खासदार झाल्यानंतर त्यांनी अनेकदा सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली होती. एससी-एसटी विधेयकातील सुधारणांच्या विरोधात मागील वर्षी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला उदित राज यांनी पाठिंबा दर्शवला होता. सरकारी नोकऱ्यांमध्ये दलितांच्या भरतीचा मुद्दाही त्यांनी लावून धरला होता. त्यामुळं पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज होतं, असं बोललं जातं. त्यातूनच त्यांचं तिकीट कापलं गेलं. त्यांच्या जागी भाजपनं प्रसिद्ध पंजाबी गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे.