‘चौकीदार चोर है’ बद्दल राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस , ३० एप्रिलला सुनावणी

राफेल प्रकरणातील आदेशावर ‘चौकीदार चोर आहे हे कोर्टानंही मान्य केलंय’ असं वक्तव्य करणं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अंगलट आलं आहे. चुकीच्या पद्धतीनं संबंध जोडल्याचं म्हणत कोर्टानं राहुलना अवमान नोटीस बजावली आहे. भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी दाखल केलेली मानहानी याचिका रद्द करण्यात यावी, अशी विनंती राहुल गांधी यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं ती फेटाळून लावली. मीनाक्षी लेखींद्वारे राहुल यांच्याविरोधात दाखल मानहानी याचिका आणि राफेल प्रकरणी निकालाविरोधात दाखल फेरविचार याचिकेवर ३० एप्रिलला एकत्रित सुनावणी होणार असल्याचं खंडपीठानं सांगितलं.
सुनावणीदरम्यान मीनाक्षी लेखी यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात बाजू मांडली. वक्तव्य चुकीचं होतं हे राहुल यांनीही मान्य केलंय. कोर्टाचे आदेश न पाहता उत्साहाच्या भरात विधान केल्याचं स्पष्टीकरण राहुल यांनी दिलं आहे. त्यांनी एका ओळीतच खेद व्यक्त केला आहे. त्यांचं दिलगिरी व्यक्त करणं हा केवळ दिखावा आहे, असं रोहतगी म्हणाले. चौकीदार कोण आहे अशी विचारणाही कोर्टानं केली. त्यावर राहुल यांनी अमेठीपासून वायनाडपर्यंत कोर्टानं चौकीदार चोर असल्याचं मान्य केल्याचा प्रचार केला आहे आणि चौकीदार नरेंद्र मोदी आहेत. एका राष्ट्रीय पक्षाचे नेते सुप्रीम कोर्टासोबत कशा प्रकारे व्यवहार करत आहेत हे बघायला हवं, असं रोहतगी म्हणाले.
कोर्टाच्या हवाल्यानं चौकीदार चोर है या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत आहे, असं राहुल गांधींच्या वतीनं वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणीवेळी सांगितलं. राहुल नम्र आणि प्रामाणिक आहेत. त्यांनी झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि याचिका रद्द करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधी हे ‘चौकीदार चोर है’ या घोषणेवर ठाम आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.