भाजपच्या सरकारच्या कामगिरीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले : नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात भाजपाने सरस कामगिरी केली आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे, त्यामुळे मी काहीही बोललो की आता काँग्रेसला शॉक बसतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. नाशिकच्या पिंपळगाव येथे भाजपा-शिवसेना महायुतीची प्रचार सभा सोमवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, आमच्या सरकारने दोन पातळींवर सरकार चालवले. समान्य माणसाचा स्तर उंचवावा आणि एकविसाव्या शतकात पायाभूत सुविधांचा विकास करीत भारताचा स्तर वाढावा यासाठी आम्ही काम केले. एका बाजूला देशातील प्रत्येक गरीब कुटुंबासाठी प्रत्येक वर्षाला ५ लाख रुपयांचा मोफत इलाज निश्चित केला. तर दुसरीकडे प्रत्येक तीन लोकसभा मतदारसंघा दरम्यान एक वैद्यकीय महाविद्यालय आणि ग्रामीण भागांत दीड लाखांहून अधिक आधुनिक आरोग्य केंद्रे बनवीत आहोत.
२०१४ पूर्वी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट होत होते. त्यावेळी स्वतःला अत्यंत अनुभवी मानणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार केवळ शोक सभाच घेत होते. तर जगात पाकिस्तानच्या नावाने गळा काढण्याचे काम करीत होते. मात्र, आता प्रत्येक दहशतवाद्याला माहिती आहे की, जर देशाच्या कोणत्याही भागात बॉम्ब स्फोट केला तर इकडे मोदी आहे. मोदी त्यांना पाताळातूनही शोधून काढत शिक्षा देईल त्यांना संपवून टाकेल, असे मोदी यावेळी म्हणाले.
मोदी म्हणाले, आज केवळ सरकारच नव्हे तर प्रत्येक भारतीयाची छाती फुलून गेली आहे. जगभरात भारत आणि भारतीयांचा जयजयकार केवळ तुमच्या मतांमुळेच होत आहे. ही आपल्या मताची ताकद आहे. आज भारत आपल्यासमोरील आव्हानांचा कणखरपणे सामना करीत आहे.