राज्यातील ८७० प्राध्यापकांच्या मुलाखतींचा मार्ग मोकळा झाला…

राज्यातील कॉलेजांमध्ये ३,५८० सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. याविरोधात ‘ऑल इंडिया नेट अॅण्ड सेट टीचर्स ऑर्गनायझेशन’ने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. यानुसार केंद्रीय आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला ८ मार्चपूर्वी जाहिरात प्रसिद्ध केलेल्या ८७० पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार सहसंचालकांनी परिपत्रक काढून कॉलेजच्या प्राचार्यांना भरतीप्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यामुळे आता ८७० पदांची नियमित भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. या पदांमध्ये ८९ कॉलेजांतील ७०३ पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांची मुलाखतीची प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे. तर २९ कॉलेजांच्या १६७ पदांना मान्यता मिळाली असून त्यांच्या जाहिरातीला मान्यता मिळणे बाकी आहे. यामुळे याचाही मार्ग मोकळा झाल्याने लवकरच याच्या जाहिराती प्रसिद्ध होऊ शकणार आहे. दरम्यान, प्रक्रिया पूर्ण झाली तरी त्याचा निकाल मात्र २९ एप्रिल रोजी राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतरच घोषित करावा, असेही आयोगाने स्पष्ट केले. सहसंचालकांच्या पत्रानंतर कॉलेजे आणि विद्यापीठे पुढील कार्यवाहीसाठी मोकळे झाल्याचे संस्थेचे संयोजक कुशल मुडे यांनी सांगितले.