आयकर विभागाने मध्य प्रदेशात टाकलेल्या धाडींमधून २८१ कोटींची बेकायदा रक्कम हस्तगत

आयकर विभागानं मध्य प्रदेशात टाकलेल्या धाडींमधून 281 कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम सापडली. या रॅकेटमध्ये उद्योग, राजकारण आणि सरकारी सेवेत असलेल्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती सीबीडीटीनं दिली. मध्य प्रदेशातील रॅकेट अतिशय मोठं आणि संघटित असल्याची माहिती आयकर विभागानं दिली. या 281 कोटींच्या रॅकेटपैकी काही रक्कम दिल्लीतील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या मुख्यालयात पाठवण्यात आली. यापैकी 20 कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून पाठवण्यात आले. यामद्ये दिल्लीच्या तुघलक रोडवरील एका वरिष्ठ नेत्याच्या निवासस्थानाचा वापर करण्यात आला, अशी धक्कादायक माहिती सीबीडीटीनं दिली.
आयकर विभागाच्या छाप्यात दारुच्या 252 बाटल्या, काही शस्त्रं आणि वाघाची कातडी सापडल्याची माहितीदेखील सीबीडीटीकडून देण्यात आली आहे. दिल्लीतील ‘त्या’ राजकीय नेत्याच्या काही जवळच्या नातेवाईकांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. त्यातून रॅकेटशी संबंधित 230 कोटींच्या रकमेचा हिशोब असलेले पुरावे हाती लागले. बोगस बिलांच्या माध्यमातून 242 कोटी रुपयांचा अपहार कसा करण्यात आला, याची माहिती यामध्ये आहे. याशिवाय घोटाळा करण्यासाठी करण्यात आलेल्या 80 कंपन्यांचे पुरावे देखील आयकर विभागाला सापडल्याची माहिती सीबीडीटीनं दिली.