भाजप जाहीरनामा : मोदींची मन कि बात : काँग्रेसची टीका !! जाहीरनाम्यात ” सबकुछ मोदी “

सब कुछ मोदी असे काही वैशिष्ट्य असलेला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेसने या जाहीरनाम्यावर ” मोदींच्या मन कि बात ” म्हणून टीका केली आहे . भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, संकल्पपत्र समितीचे प्रमुख राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भाजपानं व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलं. यावेळी भाजपाचं व्यासपीठ 2014 च्या तुलनेत पूर्णपणे बदललं होतं. यावेळी मंचावर वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अनुपस्थित होते. 2014 आणि 2019 मधील भाजपाच्या संकल्पपत्रांची तुलना केल्यास बरेच बदल जाणवतात अशी चर्चाही या निमित्ताने केली जात आहे .
संकल्पपत्र प्रसिद्ध करताना पंतप्रधान मोदी, अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संघटनमंत्री रामलाल आणि केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत उपस्थित होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र ते नागपुरातील प्रचारात व्यस्त असल्यानं उपस्थित राहू शकले नाहीत असे सांगण्यात आले.
आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. भाजपाने सन 2022 पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार अशा विविध मुद्द्यावर भाजपाने ‘संकल्पपत्र’ तयार केले आहे. दरम्यान, या संकल्पपत्रावरुन काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे.
काँग्रेसने ट्विटरवर म्हटले आहे की, “जाहीरनाम्याचा फोटो आम्हाला सांगतो की आमच्यासाठी देशातील लोक महत्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी फक्त आपला चेहरा. आमच्या जाहीरनाम्यात देशातील करोडो लोकांचे विचार आहेत. तर भाजपाच्या जाहीरनाम्यात फक्त एकाच व्यक्तीची ‘मन की बात’. आता देश आपल्या मनातील निर्णय ऐकवेल.”
2014 मधील भाजपाच्या जाहीरनाम्यावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह (तत्कालीन पक्षाध्यक्ष) यांचे फोटो होते. तर खाली नरेंद्र मोदी (पंतप्रधान पदाचे उमेदवार), अरुण जेटली, सुषमा स्वराज, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मुरली मनोहर जोशी, रमण सिंह, मनोहर पर्रीकर यांचे फोटो होते. यावेळी मात्र मोदी यांच्याशिवाय दुसरे काहीही नाही हा सुद्धा एक चर्चेचा मुद्दा झाला आहे.