भारताकडून पुन्हा हल्ला होण्याची पाकिस्तानला वाटतेय भीती ….

भारत या महिन्यात पुन्हा एकदा हल्ला करू शकतो असा दावा पाकने गोपनीय माहितीच्या आधारे केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी रविवारी हा दावा केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर कारवाई करत प्रत्युत्तर दिले होते. तेव्हापासून दोन्ही अणवस्त्र सज्ज देशांमध्ये तणाव आहे. १६ ते २० एप्रिल दरम्यान भारत हल्ला करू शकतो, असे शाह यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानने भारताचा किती धसका घेतला आहे, हे यावरून दिसते. एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतातून येणाऱ्या-जाणाऱ्या विमान उड्डाणांसाठी आपले एअरस्पेस बंद केले होते. पाकिस्तानने दोन दिवसांपूर्वी पश्चिमी देशांकडे जाणाऱ्या उड्डाणांसाठी आपला एक हवाई मार्ग सुरू केला. तर उर्वरित १० हवाई मार्ग अजूनही बंद आहेत.
कुरेशी यांनी मुलतान येथे माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. भारत पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करण्याच्या तयारीत आहे. आमच्या माहितीनुसार हा हल्ला १६ ते २० एप्रिल दरम्यान होऊ शकतो.’ पण कुरेशी यांनी कोणत्या आधारावर हा दावा केला हे सांगितले नाही. पंतप्रधान इम्रान खान यांना ही माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. भारतातील परराष्ट्र मंत्रालयाला यासंबंधी केलेल्या ई मेलचे अद्याप उत्तर आले नसल्याचे ते म्हणाले.