UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील उमेदवारांची गगन भरारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून, त्यात कनिष्क कटारीयाने देशातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. सृष्टी देशमुखने पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण होत, महिलांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. पुण्याच्या जीएसटी कार्यालयात सहायक अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या तृप्ती धोडमिसे १६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. हे तिन्ही उत्तीर्ण उमेदवार इंजिनीअर असल्याने, यंदाच्या निकालात पुन्हा एकदा इंजिनीअर्सनी बाजी मारली आले.
या परीक्षेसाठी १० लाख ६९ हजार ५५२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तार लाख ९३ हजार ९७२ विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १० हजार ४६८ विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिली. यातील १९९४ विद्यार्थ्यांच्या मुलाखती गेल्या महिन्यात पूर्ण झाल्या. त्यानंतर यूपीएससीने अंतिम निकाल जाहीर केला आहे. या निकालातून ७५९ उमेदवारांची आयएएस (१८०), आयएफएस (३०), आयपीएससाठी (१५०), गट अ (३८४), गट ब (६८) पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.निकालात प्रथम आलेला कनिष्कने एससी प्रवर्गातून अर्ज केला होता. कनिष्कने आयआयटी मुंबईतून कम्प्युटर सायन्स शाखेतून बी-टेक केले असून, त्याने परीक्षेसाठी ऑप्शनल विषय म्हणून गणिताची निवड केली होती. सृष्टीने भोपाळच्या राजीव गांधी प्रोद्योगिकी विश्वविद्यालयातून केमिकल शाखेत इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. देशातून दुसऱ्या क्रमांकाने अक्षत जैन तर तिसऱ्या क्रमांकाने जुनेद अहमद उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या पूजा मुळे ही अकराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून, ती परराष्ट्र सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान, पहिल्या २५ यशस्वी उमेदवारांपैकी १५ मुले, तर १० मुली आहेत.
देश पातळीवरील उत्तीर्ण उमेदवारांमध्ये महाराष्ट्राच्या उमेदवारांनी भरारी घेतली आहे. या निकालात पूजा प्रियदर्शनी मुळे (११), तृप्ती धोडमिसे (१६), वैभव गौंदवेने (२५), मनीषा आव्हाळेने (३३), हेमंत पाटील (३९), स्नेहल धायगुडे (१०८), दिग्विजय पाटील (१३४), नचिकेत शेळके (१६७) अमित काळे (२१२), योगेश पाटीलने (२३१), नवजीवन पवार (३१६), निलेश कुंभार (५०३) क्रमांकाने य़शस्वीतांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
पहिले दहा उत्तीर्ण उमेदवार
१-कनिष्क कटारिया २-अक्षत जैन ३-जुनैद अहमद ४-श्रवण कुमात ५-सृष्टि जयंत देशमुख ६-शुभम गुप्ता ७-कर्नाटी वरूणरेड्डी ८-वैशाली सिंह ९-गुंजन द्विवेदी १०-तन्मय वशिष्ठ शर्मा