Sharad Pawar : प्रचाराचे मुद्दे संपल्याने मोदी, गांधी घराण्यावर आणि आपल्यावर व्यक्तिगत आरोप करीत आहेत , लुंग्या सुंग्यांच्या आरोपांना भीक घालत नाही !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडील प्रचाराचे मुद्दे संपले आहेत. त्यामुळे गांधी घराण्यावर आरोप करतानाच आता ते आमच्या घरावरही आरोप करू लागले आहेत. मात्र, हा शिवराय, फुले- शाहूंचा महाराष्ट्र आहे. असल्या लुंग्यासुंग्यांच्या आरोपांना महाराष्ट्र कधीच भीक घालणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली.
लोकसभेच्या नगर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी शेवगावमध्ये घेतलेल्या सभेत पवार बोलत होते. मोदींवर टीका करताना त्यांनी गांधी घराण्याचे कौतुक केले. पवार म्हणाले, ”गांधी घराण्याने या देशासाठी मोठा त्याग केला आहे. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनीही तुरुंगवास भोगला आहे. देशाच्या प्रगतीत गांधी घराण्याचा, काँग्रेसच्या सरकारांचा मोठा वाटा आहे. मात्र मोदी हे गांधी घराण्यावर सतत टीका करत आहेत. आता त्यांच्याकडील मुद्दे संपल्याने ते वैयक्तिक मुद्द्यांवर आले आहेत. आपला महाराष्ट्र शिवरायांचा, फुले-शाहू -डॉ. आंबेडकरांचा आहे. वेळ पडली तर येथील तरुण छातीचा कोट करून पुढे येतो. त्यामुळे असल्या लुंग्यासुंग्यांच्या आरोपांना हा महाराष्ट्र भीक घालणार नाही.”
‘सर्जिकल स्ट्राइकचा राजकारणासाठी वापर करणे हा सैन्याचा अपमान आहे. आमच्या सरकारच्या काळातही अशी कारवाई अनेकदा करण्यात आली. मात्र जगातील आपली प्रतिमा कायम राखण्यासाठी त्याचा कधी गवगवा केला नाही. मात्र, मोदी हे केवळ जाहिरातींवर भर देणारे आहेत. पाच हजार कोटी रुपये त्यांनी जाहिरातींवर खर्च केले होते. ५५ महिन्यांत त्यांनी ९२ विदेश दौरे केले. त्यावर १३०० कोटी रूपये खर्च झाले. शिवस्मारक तर अद्याप झाले नाही; पण त्याच्या जाहिरातींवर १८ कोटी खर्च झाले. सरदार पटेलांच्या पुतळ्याचा निम्मा खर्च जाहिरातींवर झाला. स्विस बँकेतील काळा पैसा भारतात आणणे अवघड आहे. मात्र, देशातील श्रीमंतांकडील काळा पैसा बाहेर काढला तरी मोठे काम होईल,’ असे पवार म्हणाले.