शरद पवार यांच्या सोलापुरातील सभेला आचारसंहितेचा फटका

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात घेतलेली जाहीर सभा निवडणूक आचारसंहितेचा आणि जमावबंदी आदेशाचा भंग करणारी असल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने सभेच्या आयोजकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र चौकाजवळील सोलापूर महापालिका प्राथमिक शाळेसमोरील मैदानावर सायंकाळी पवार यांची प्रचार सभा झाली होती. परंतु यात निवडणूक आचारसंहिता आणि जमावबंदी आदेशाचा भंग झाल्याची फिर्याद निवडणूक प्रशासन यंत्रणेतील पुरूषोत्तम हरिसंगम यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यानुसार सभेचे आयोजक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. शरद पवार यांची जाहीर सभा सुरूवातीला कन्ना चौकात आयोजित करण्याचे ठरले होते. परंतु प्रशासनाने परवानगी नाकारली असता शेवटच्या क्षणी नजीकच्या राजेंद्र चौकाजवळील महापालिका प्राथमिक शाळा मैदानावर ही सभा घेण्यासाठी पर्याय आला. त्यासाठी आयोजकांनी परवाना मागितला असता शेवटच्या क्षणी परवाना मिळाला नाही. मात्र तोपर्यंत त्याच ठिकाणी सभेची तयारी झाली होती. सभेला सुरूवात होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परवानगी नाकारणारे पत्र प्रशासनाकडून मिळाल्याचे सभेचे आयोजक प्रकाश वाले यांचे म्हणणे आहे.
निवडणूक प्रशासन मनमानी आणि पक्षपाती कामकाज करीत असल्याचा आरोप वाले यांनी केला आहे. सुरूवातीला कन्ना चौकात पवार यांच्या प्रचारसभेसाठी परवानगी मागितली असता ती नाकारली गेली. तेव्हा लगेचच तेथून जवळच असलेल्या राजेंद्र चौकातील महापालिका शाळेच्या मैदानावर सभेसाठी परवानगी देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली. त्यानुसार प्रक्रिया पूर्ण झाली आणि सभेला सुरूवात होणार, इतक्यात केवळ अर्ध्या तासापूर्वी प्रशासनाकडून सभेला परवानगी नाकारली गेली असे ते म्हणाले.