मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या मतांचे विभाजन विरोधकांचा डाव , लोहा-कंधारात पाण्याऐवजी दारुचेच वाटप अधिक : अशोक चव्हाण

मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या मतांचे विभाजन झाल्यास भाजपालाच त्याचा फायदा होणार आहे़ त्यामुळे या मतांचे विभाजन टाळण्याची गरज आहे़ विरोधकांचा हा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे़ त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे़ असे प्रतिपादन खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़ यावेळी चिखलीकरांचे नाव न घेता लोहा-कंधारात पाण्याऐवजी दारुचेच वाटप अधिक वाटप होत असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले़. नाळेश्वर येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती़ .
यावेळी बोलताना खा़. चव्हाण पुढे म्हणाले, देशात शेतकऱ्यांवर भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ या सरकारने आणली़ १५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या़ तरी हे सरकार गप्प आहे़. या सरकारला आता मत मागायला लाज कशी वाटत नाही़ ? तुराटी येथे शेतक-याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली़ सर्वसामान्यांच्या हिताच्या सर्व योजना बंद केल्या़ उज्ज्वला गॅस योजना फसवी आहे़ बेरोजगारांचे लोंढे कामाच्या शोधात फिरत आहेत़ परंतु सरकारकडून त्यांची अवहेलनाच होत आहे़ दुष्काळनिधीच्या वाटपातही भाजपाकडून भेदभाव करण्यात येत आहे़.
आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वतंत्र शेतकरी अर्थसंकल्प तसेच किमान वेतन योजनेद्वारे प्रतिवर्षी ७२ हजार रुपये बँक खात्यात टाकले जातील़ दिवंगत शंकरराव चव्हाण व पद्मश्री श्यामराव कदम यांच्यामुळेच विष्णूपुरी, अप्पर पैनगंगा प्रकल्प झालेत़ त्यामुळे हा भाग सुजलाम् सुफलाम् झाला़ भाजपा उमेदवाराने बंद केलेले कारखाने आम्ही सुुरु करु़ असेही ते म्हणाले़.