नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हायला पाहिजे, म्हणणारे कोण आहेत राज्यपाल ? ज्यांच्या पदावर आले संकट !!

लोकसभा निवडणुकीआधी राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली गेली पाहिजे असं म्हटलं आहे. राज्यपाल कल्याण सिंह यांनी एका प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हायला पाहिजे असं म्हटलं होतं. विरोधी पक्षांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. चौकशी केल्यानंतर कल्याण सिंह यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गृहमंत्रालयाला कल्याण सिंह यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास सांगितल आहे. एखाद्या राज्यपालाने आचारसंहितेचं उल्लंघन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार करण्याची ही पहिलीच वेळ असावी. राज्यपालसारख्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे.
यादरम्यान राज्यपाल कल्याण सिंह यांनी राष्ट्रपतींकडे भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. काँग्रेस रामनाथ कोविंद यांच्याकडे राज्यपालांनी पदाचा गैरवापर केल्याची तक्रार करणार असल्याची माहिती आहे. याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. या पत्रात राज्यपालांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीशी संबंधित हे दुर्मिळ आणि गंभीर प्रकरण असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. या सर्व घडमोडींनंतर राज्यपालांना हटवलं जाणार का ? अशी चर्चा सुरु आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपालांना हटवायचं की नाही हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत.