Election Commission : निती आयोगाच्या उपाध्यक्षांकडून आचारसंहिता भंग झाला पण सूचनेवरच भागले !!

गरिब कुटुंबाला वर्षाकाठी ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसच्या ‘न्याय’ योजनेवर टिपण्णी करून निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने नमूद केले असून भविष्यात अशाप्रकारची वक्तव्ये करू नयेत, अशी सल्लावजा सूचनाच आयोगाने राजीव यांना दिली आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्याय योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर हे आश्वासन केवळ निवडणुकीपुरते आहे. ही योजना प्रत्यक्ष राबवणे अशक्य आहे. अशी योजना अर्थव्यवस्थेसाठीही मारक आहे, अशी टिपण्णी राजीव कुमार यांनी केली होती.
राजीव कुमार यांच्या या टिपण्णीवर जोरदार आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आयोगाने राजीव कुमार यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर राजीव यांनी स्पष्टीकरण देताना, हे निती आयोगाचे नाही तर माझे वैयक्तिक मत असल्याचे नमूद केले होते. मात्र, या स्पष्टीकरणाने आयोगाचे समाधान झाले नाही. आयोगाने हा आचारसंहितेचा भंग असल्याचे नमूद करत राजीव यांना यापुढे अशी विधाने करू नयेत, असा खरमरीत सल्लाही दिला आहे.