मोदीची अवस्था गजनी चित्रपटातील नटासारखी आणि मुंडे भगिनींचे स्वत:चे कर्तृत्व काय ? : धनंजय मुंडे

‘बीडची निवडणूक माझ्यासाठी प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक मोठ्यांचे लेकरू विरुद्ध सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलगा अशी आहे. मुंडे भगिनींचे स्वत:चे कर्तृत्व काय आहे,’ अशी जोरदार टीका करत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेयांनी भाजप नेत्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर तोफ डागली.
सिडको परिसरातील शिवछत्रपती कॉलेजमध्ये मंगळवारी समस्त बीड जिल्हा मित्र मंडळातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार सतीश चव्हाण, अभिजित देशमुख, ज्येष्ठ विधीज्ञ व्ही. डी. सांळुके यांच्यासह औरंगाबादेत राहणारे बीड येथील मूळ रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मुंडे यांनी मोदींवर तोड डागली. ‘२०१४च्या निवडणुकीत केलेले भाषण नरेंद्र मोदी यांनी पुन्हा ऐकले तर, निवडणूक प्रचारासाठी कसे जावे, असा प्रश्न त्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. मोदीची अवस्था गजनी चित्रपटातील नटासारखी झाली आहे. खोटी आश्वासन देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे. देशात एक प्रकारची हुकुमशाही सुरू आहे,’ असा आरोप त्यांनी केला. ‘बीडमध्ये एकाच कुंटुबांकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आहे. असे असतानाही बीडचा विकास का झाला नाही. रेल्वे प्रश्नांसह अन्य प्रश्न का सुटले नाहीत. मुंडे भगिनीचे स्वत:चे कर्तृत्व काय?’ असा सवाल त्यांनी केला. यावेळी आमदार चव्हाण यांनीही मत मांडले.