प्रियंका गांधी ख्रिश्चन, काशी विश्वनाथ मंदिरात कशा जाऊ शकतात ? भावना दुखावल्या म्हणून न्यायालयात याचिका

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या विरोधात वाराणसी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रियंका गांधी या ख्रिश्चन असल्याने त्या काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकत नाहीत असं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात २० मार्च रोजी पूजा केली होती. त्यानंतर कमलेश चंद्र त्रिपाठी या वकिलाने सोमवारी (१ एप्रिल) याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.
त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे कि , प्रियंका यांची ख्रिश्चन धर्मावर श्रद्धा आहे. त्यामुळे त्या काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा करू शकत नाहीत. यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच प्रियंका गांधी या मांसाहारी आहेत असं ही त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. त्रिपाठी यांनी प्रियंका यांच्यासह मंदिराचे पुजारी राजन तिवारी यांच्याविरोधातही याचिका दाखल केली आहे. तिवारी यांनी प्रियंका यांना पूजा करण्यासाठी मदत केली असल्याचं त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने मान्य केली असून यापुढील सुनावणी १२ एप्रिल रोजी होणार आहे. प्रियांका गांधी यांच्याविरोधात आयपीसी कलम 419, 295, 295ए आणि 171 एच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.