नरेंद्र मोदी यांच्या पवार काका पुतण्यावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ध्यातील सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.पंतप्रधान मोदी यांच्या वर्ध्यातील सभेने महाराष्ट्रातील प्रचाराची सुरवात आज झाली. पहिल्या टप्प्यात विदर्भातील वर्ध्यासह सात मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. मोदींना महाराष्ट्रातील आपल्या पहिल्याच सभेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर तुफान हल्ला केला.
मोदी म्हणाले, की शरद पवार यांनी प्रत्येक काम विचारपूर्वकच केले आहे. `मी राज्यसभेतच खूष आहे’ असे सांगत अचानक त्यांनी निवडणुकीच्या रणांगणातून माघार घेतली. त्यामुळे पवार यांना हवा कोणत्या दिशेने सुरू आहे, हे चांगले कळते.
अजित पवार यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, की पाण्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याशी बोलताना अजित पवारांनी वापरलेली भाषा असभ्य होती.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात मावळमध्ये झालेल्या शेतकऱ्यांवरील गोळाबाराची आठवणही मोदी यांनी उपस्थितांना करून दिली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार `कुंभकर्णा’सारखे होते, अशीही टीका त्यांनी केली.