गौरवास्पद आणि भूषणावह : ‘इस्रो’ : एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शिरपेचात सोमवारी आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे २८ नॅनो उपग्रहांचे सोमवारी श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
एमीसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवण्याची ऐतिहासिक कामगिरी ‘इस्रो’ने सोमवारी केली. सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपक एमीसॅट व २८ नॅनो उपग्रहांना घेऊन झेपावले. पीएसएलव्ही प्रक्षेपकाने चांद्रयान २००८ व मंगळ ऑर्बिटर २०१३ या दोन्ही मोहिमांत मोठी भूमिका पार पाडली होती. यात अमेरिकेतील २४, लिथुआनियातील ११ ,स्पेनमधील १ तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे.
‘इस्रो’ची ही ४७ वी पीएसएलव्ही मोहीम असून सोमवारची मोहीम चार टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. एमीसॅट उपग्रह हा विद्युत चुंबकीय मापनासाठी काम करणार आहे. प्रक्षेपक अंतराळात ७४९ किमीवर एमीसॅट उपग्रह सोडेल आणि ५०४ किमी ऑर्बिटमध्ये इतर उपग्रहांना प्रक्षेपित करणार आहे.
एमीसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. ४३६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे. रात्रीच्यावेळी सुद्धा फोटो काढण्याची या उपग्रहाची क्षमता आहे. या उपग्रहामुळे शत्रूच्या भागात मोबाईल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रीय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना कळणार आहे.