PNB Scam : नीरव मोदीचा जामीन लंडनच्या लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने फेटाळला

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने फेटाळला आहे. भारतीय तपास यंत्रणांसाठी हे मोठे यश आहे. कारण, मोदीला जामीन मिळू नये यासाठी या तपास यंत्रणांनी कोर्टात अत्यंत दमदारपणे आपली बाजू माडंली होती. दरम्यान, २६ एप्रिल रोजी आता पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी नीरव मोदीला प्रत्यक्ष कोर्टात हजर न करता तुरुंगातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सहभागी करण्यात येणार आहे. कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर ईडी आणि सीबीआयच्या संयुक्त पथकातील अधिकाऱ्यांनी अंगठा वर करुन विजयी मुद्रा दाखवत तसेच एकमेकांशी हस्तांदोलन करीत आनंद व्यक्त केला, असे एएनआयच्या लंडनमधील प्रतिनिधींनी म्हटले आहे.
दरम्यान, या ठिकाणी अनेक धक्कादायक खुलाशे झाले आहेत. भारतीय प्राधिकरणाच्यावतीने बाजू मांडणाऱ्या टॉबी कॅडमनने कोर्टाला सांगितले की, नीरव मोदीने एक साक्षीदार आशिष लाड याला बोलावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ईडीच्या वकिलांनी कोर्टात फरार नीरव मोदीला जामीन न देण्याची मागणी केली आहे. कॅडमॅन यांनी कोर्टात हे देखील सांगितले की, नीरव मोदी भारतीय तपास तथकांना सहकार्य करीत नाही. तसेच त्याला जामीन द्यावा असे कोणतेही पुरेसे कारण नसल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, कारण जामीन मिळाल्यानंतर तो सर्वप्रथम देश सोडू शकतो. तसेच जर तो तरुंगातून बाहेर पडला तर पुरावे नष्ट करण्याचा आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न करु शकतो.
दरम्यान, या युक्तीवादावर टिपण्णी करताना मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बथनॉट म्हणाले, ही केवळ काही कागदांची मोठी फाईल आहे. अर्बथनॉट यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते. नीरव मोदीच्या वकिलाने सुनावणीपूर्वी सांगितले की, ते प्रभावीपणे याचिका दाखल करण्याचा प्रयत्न करणार. यापूर्वी जिल्हा न्यायाधीश मेरी मॅलोनच्या कोर्टात पहिल्यांदा सुनावणीदरम्यान नीरव मोदीची याचिका फेटाळली होती. नीरव मोदीला स्कॉटलँड यार्डने मध्य लंडनमध्ये एका बँक शाखेतून अटक करण्यात आली होती. बँकेत तो नवे खाते खोलण्यासाठी गेला होता. भारतीय प्राधिकरणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी पहिल्या सुनावनीत सांगितले होते की, नीरव मोदी सुमारे दोन अब्ज डॉलरच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी भारताला हवा आहे.