औरंगाबाद आणि अकोल्यात आम्हाला पाडण्यासाठी खा. अशोक चव्हाणांची सुपारी : आ. इम्तियाज जलील यांचा आरोप

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मला पाडण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सुपारी घेतली असल्याचा आरोप एमआयएमचे लोकसभा उमेदवार इम्तियाज जलील यांनी केला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांना औरंगाबादेतून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्यास देखील चव्हाण यांनीच सांगितले असल्याचा दावाही इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमने आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्ष भाजपला अक्षरशः विकून टाकला आहे. राधाकृष्ण विखे पाटील कॉंग्रेसमध्ये, तर त्यांचा मुलगा सुजय भाजपमध्ये, नारायण राणे भाजपमध्ये तर त्यांचा मुलगा नीतेश कॉंग्रेसमध्ये. तरी कुणावरही कारवाई होत नाही.
कॉंग्रेसने सातत्याने आपल्या स्वार्थासाठी मुस्लिम मतांचा वापर केला. एरवी निवडणुकीत उमेदवारी देतांना मुस्लिमांना डावलणाऱ्या कॉंग्रेसने यावेळी मुद्दाम अकोला मतदारसंघातून मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले. यामागे केवळ प्रकाश आंबेडकरांना पराभूत करणे हा कॉंग्रेसचा एकमेव उद्देश आहे. औरंगाबादमध्ये देखील कॉंग्रेसने हीच चाल खेळत आमदार अब्दुल सत्तार यांना बंडखोरी करायला लावून अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी पुढे केले आहे. अर्थात पैसे घेऊन अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरूनच ही बंडखोरी झाली आहे असा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमन पाटील, पतंगराव कदम यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विश्वजीत कदम यांना कॉंग्रेसने बिनविरोध निवडून आणले. पण फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारायचे, त्यांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्याच नातवाला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करायचे हेच कॉंग्रेस आतापर्यंत करत आली आहे. प्रकाश आंबेडकरांना एखाद्या मतदारसंघातून बिनविरोध निवडून का आणले जात नाही ? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी उपस्थित केला.