उर्मिला मातोंडकरच्या प्रवेशासाठी वेळ, पण माझ्यासाठी नाही , तरीही काँग्रेसचेच काम करणार – प्रविण गायकवाड
पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे प्रविण गायकवाड यांनी जाहीर केले. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला प्रवेश देण्यासाठी काँग्रेस पक्षाला वेळ आहे. पण माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी वेळ नाही अशा शब्दात प्रविण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर खंत व्यक्त करीत तरीही जातीय शक्तींच्या पराभवासाठी आपण काँग्रेचेच काम करू असा संकल्प संभाजी ब्रिगेड हे नेते प्रवीण गायकवाड यांनी केला.
पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी सत्यजीत तांबे, केशवचंद यादव, धीरज शर्मा, प्रविण गायकवाड, चित्रलेखा पाटील तसेच आजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रविण गायकवाड म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडून पुणे शहराच्या उमेदवारी बाबत अद्याप पर्यंत घोषणा झाली नाही. या काँग्रेस पक्षाला आमचे विचार चालतात, काम चालते पण उमेदवारी चालत नाही. त्यामुळे मी माझी उमेदवारी मागे घेतली आहे. या पुढे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे सांगितले तसेच ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत राज्यातील इतर जागांवर काँग्रेसला आयात उमेदवार चालतात. तर मी मागील कित्येक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम केले असताना देखील उमेदवारी नाकारल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.