Modi Strike : ” सबूत चाहिये कि सपूत ? ” पुरावे मागणारांवर मोदींचा हल्ला बोल !!

जमीन, आकाश आणि अवकाशात सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत चौकीदार सरकारने केली असं सांगत एअर स्ट्राइकचा पुरावा मागणाऱ्यांवर नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. देशाला पुरावा हवा की वीरपुत्र अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. नरेंद्र मोदींनी मेरठ येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी जी कामं केली त्याचा हिशेब देणार आणि विरोधकांना जेव्हा तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही अपयशी का राहिलात हा प्रश्नही विचारणार असल्याचं सांगितलं.
एकीकडे चौकीदार तर दुसरीकडे रागदारांची राग आहे असं सांगताना एकीकडे भारताचे संस्कार तर दुसरीकडे वंशवाद, भ्रष्टाचार आहे अशी टीका त्यांनी काँग्रेससहित विरोधकांवर केली. यावेळी नरेंद्र मोदींनी मिशन शक्तीसंबंधीही भाष्य केलं. अवकाशातही आम्ही आपली ताकद दाखवली आहे असं सांगताना त्यांनी टीका करणाऱ्या राहुल गांधी आणि विरोधकांना टोला लगावला. राहुल गांधी यांना ए-सॅट म्हणजे रंगभुमीवरील सेट वाटला. आता त्यांच्यावर हसायचं की रडायचं हेच कळत नाही. त्यांची कीव येते असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना आपल्या सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा माडंला. 34 कोटी गरिबांसाठी बँक खाती सुरु केली. 12 कोटी शेतकऱ्यांना 75 कोटींची मदत केली. गुंडागर्दी, दहशतवादापासून सुरक्षा देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शनचं आश्वासन आम्ही पूर्ण केलं. घोषणाबाजी करणारी सरकारं फार पाहिली पण ठोस निर्णय घेणारं सरकार पहिल्यांदाच पाहिलं असं सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
राहुल गांधींनी घोषणा केलेल्या न्याय स्कीमवरही नरेंद्र मोदींनी टीका केली. जे खातं सुरु नाही करु शकले ते त्यात पैसे काय टाकणार असा टोला त्यांनी लगावला. नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा महाआघाडीचा उल्लेख महामिलावट सरकार करत त्यांच्या हाती सत्ता आली तर देश पुन्हा भुतकाळात जाईल असं सांगत देश त्यांच्या हाती सुरक्षित राहिल का ? असा सवाल विचारला.
चौकीदारला आव्हानं देणारे आता रडत फिरत आहेत असं सांगत मोदींनी महाआघाडीच्या नेत्यांवर टीका केली. मोदीने असं का केलं ? मोदींने दहशतवाद्यांच्या घऱात घुसून का मारलं असं विचारत आहेत ? पाकिस्तानात कोण हिरो होणार याची विरोधकांमध्ये स्पर्धा सुरु आहे. त्यांच्या नावे पाकिस्तानात टाळ्या वाजवल्या जात आहेत अशी टीका करताना आपल्याला देशातील हिरो हवे आहेत की पाकिस्तानचे असा सवाल त्यांनी विचारला.