कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या चौकशीत दिरंगाई : मुख्यमंत्र्यांना न्यायालयाने सुनावले खडे बोल !!

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तुमच्याकडे गृहखाते आहे. त्याशिवाय अनेक महत्त्वाची खाती तुम्ही बाळगता, मग तशी कार्यक्षमताही दाखवा, असं सांगतानाच तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज केला.
नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात याचिका सादर केल्या. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने मुख्यमंत्र्यांसह तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले. पानसरे हत्याप्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने सुरू असल्याने कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पानसरे हत्याप्रकरणात महाराष्ट्र एसआयटी अजूनही खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचू शकली नाही. तपासही संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे गृहखाते सांभाळणारे फडणवीस यांना कोर्टाने खडेबोल सुनावले. तसंच दाभोलकर-पानसरे प्रकरणात मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी, सचिव आदींनी विशेष लक्ष द्यायला हवं, असं मतंही व्यक्त केलं.
कनिष्ठ अधिकाऱ्यांना तपासात अपयश येतं तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालायला हवे. फरार आरोपींवरील बक्षिसाच्या रकमेत वाढ केल्याने लोक आरोपीला पकडून देतील हा भ्रम आहे. आरोपींना पकडण्याची जबाबदारी ही पोलिसांचीच असते, असंही कोर्टानं सांगितलं.