शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला काँग्रेसमध्ये , “मोहब्बत करने वाले कम न होंगे, (शायद) तेरी महफिल में लेकिन हम न होंगे !!”

भाजप आणि मोदी सरकारच्या विरोधात ठोस भूमिका घेणारे बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा अखेर २८ मार्चला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस नेते अखिलेश प्रसाद सिंह यांनी हि माहिती दिली आहे. भाजपानं त्यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते.
या विषयी अधिक माहहती देताना अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले, शत्रुघ्न सिन्हा २८ मार्चला सकाळी ११.३० वाजता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेस त्यांच्या संपर्कात होती . २८ मार्चला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत शत्रुघ्न सिन्हा पक्षात प्रवेश करणार असून, पटना साहिबमधून ते रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. गेल्या आठवड्यात भाजपानं बिहारमधील एनडीएच्या ४० उमेदवारांची नावं जाहीर केली होती. ज्यात पटना साहिबमधून भाजपानं रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे.
शत्रुघ्न सिन्हा २०१४ मध्ये मोदींचं सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने भाजपाविरोधात बोलत होते. राफेलच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच राफेल करारातील मोदींच्या सहभागासंदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. शत्रुघ्न सिन्हांनी भाजपा सोडण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपामध्ये नाराज आहेत. ट्विट करत त्यांनी मोदींना इशाराही दिला आहे. मोहब्बत करने वाले कम न होंगे, (शायद) तेरी महफिल में लेकिन हम न होंगे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.