ज्यांनी कधी कागदी विमानंही बनवली नाहीत त्यांना हे मोठी विमानं बनवण्याचे काम कसे देण्यात आले : शरद पवारांनी मोदींना घेरले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बहुचर्चित केलेल्या राफेल विमानांच्या खरेदीतेली कथित घोटाळ्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज परभणीच्या सभेत चांगलेच टार्गेट केले . या विषयावर बोलताना ते म्हणाले कि , मनमोहन सिंग पंतप्रधान असताना राफेल कराराच्या काही वाटाघाटी झाल्या होत्या. त्यावेळी विमानाची किंमत ३५० कोटी होती. सरकार बदलल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी या विमानाची किंमत संसदे ६७० कोटी सांगितली.
विमान खरेदीच्या वेळी खासगी कंपन्यांना भागीदार करण्यात आले आणि एका विमानासाठी १६६० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव झाला. देशात विमानं निर्मितीसाठी सरकारच्या मालकीच्या तीन कंपन्या आहेत. पण त्यांना काम न देता खासगी कंपन्यांना काम देण्यात आलं. ज्यांनी कागदी विमानंही कधी बनवली नाहीत त्यांना हे मोठी विमानं बनवण्याचं काम देण्यात आलं. या कराराची चौकशी झाली पाहिजे की नाही असा प्रश्न शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्टाईलमध्येच विचारला. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची गुप्त माहिती नीट ठेवता येत नाही ते देशाचं रक्षण कसं करणार ? असा प्रश्न उपस्थित करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. राफेलची कागदपत्रं चोरीला गेली होती असं सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं तोच मुद्दा उचलून धरत शरद पवारांनी ही टीका केली आहे. परभणी या ठिकाणी झालेल्या रॅलीत ते बोलत होते.
पुलवामात देशाचे जवान शहीद झाले, त्यावेळी सगळ्या पक्षांनी सरकारसोबत रहाण्याची भूमिका घेतली. मात्र या हल्ल्याचं सरकारने राजकारण केलं. विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने अटक केली होती. आंतरराष्ट्रीय करारानुसार त्यांची सुटका करण्यात आली. ज्यानंतर भाजपाने ५६ इंचाच्या छातीचा दावा केला. अभिनंदन यांना सोडवण्यात आलं तसं कुलभूषण जाधवला का सोडण्यात आलं नाही? तेव्हा ५६ इंच छाती कुठे गेली असाही प्रश्न शरद पवारांनी विचारला.