मोदींनी राम मंदिरप्रकरणात देशातील हिंदुंचा विश्वासघात केला, त्यांना रामाची भिती वाटते का ? : प्रवीण तोगडिया

मोदींनी राम मंदिरप्रकरणात देशातील हिंदुंचा विश्वासघात केला आहे. केंद्र सरकारने शेतकरी आणि युवकांचीही फसवणूक केली आहे. आमच्या पक्षाकडून यावेळी १०० उमेदवार उभे करण्यात आल्याचे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत जाऊन हिंदू असल्याचे प्रमाण दिले पाहिजे, असे खुले आव्हान हिंदुस्तान निर्माण दलाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. मागील पाच वर्षांत कोणत्या कारणांमुळे पंतप्रधान मोदी हे अयोध्येत गेले नाहीत. त्यांना रामाची भिती वाटते का ? असा सवाल करत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी किमान अयोध्येत जाण्याचे पाऊल तर उचलत आहेत, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.
मोदी भाजपाला राम मंदिराच्या मुद्द्यावर घेरतात तोगडिया पुढे म्हणाले, भाजपासाठी राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा आहे. चहावाला पण निवडणुकीचा मुद्दा होता आता चौकीदारही तसाच प्रकार आहे. मला विश्वास आहे की, देशातील जनता त्यांच्या राजकीय राष्ट्रावादाने भ्रमित होणार नाही. मोदींच्या कार्यकाळात एक हजार सैनिक मारले गेले. यावर कोणीच चर्चा करत नाहीत. निवडणूक हाच त्यांचा राष्ट्रवाद आहे. भारताचा प्रत्येक नागरिक देशभक्त आहे. काश्मीरमध्ये लष्करावर दगडफेक करणाऱ्यांवर सक्त कारवाई केली पाहिजे. देशात सांस्कृतिक विकासाबरोबर समृद्धीचीही संधी मिळायला हवी. दोन पेक्षा अधिक अपत्यांना जन्म देणाऱ्यांवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
लालकृष्ण अडवाणी, जोशी यांना आडवाळणीला टाकण्यावरही त्यांनी टीका केली , जे कालपर्यंत मार्गदर्शक होते. त्यांना आता मूकदर्शक बनवले आहे. माझ्या समर्थकांनी मला अयोध्या, मथुरा, काशी येथून निवडणूक लढवण्यास सांगितले होते. अयोध्येत आपण उभे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले . मथुरेची तारीख निघून गेली आहे. काशीमधून निवडणूक लढण्यावर विचार होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.