Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“मोदी-शहा “जोडीला गुजराती “ठग ” म्हणणारा पक्षातून ६ वर्षासाठी पक्षाबाहेर … आणि तो म्हणाला “खरे बोलणे गुन्हा आहे का ? “

Spread the love


भाजपा नेतृत्त्वाचा उल्लेख गुजराती ” ठग “म्हणून केल्यानं भाजपानं लखनऊमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते आय. पी. सिंह यांचं निलंबन केलं. सिंह यांनी ट्विटरवरुन भाजपा नेतृत्त्वावर कडाडून टीका केली होती. “भाजपानं पंतप्रधान निवडला आहे की प्रचारमंत्री” असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर तोफ डागल्यानं आय. पी. सिंह यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं. यावरुनही त्यांनी पक्षाला लक्ष्य केलं. ‘सहा वर्षांसाठी माझं निलंबन करण्यात आल्याची माहिती मला माध्यमांमधून मिळाली. मी माझ्या आयुष्यातील तीन दशकं पक्षासाठी दिली. मात्र केवळ खरं बोललो म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात आली. खरं बोलणं हा गुन्हा असेल, तर पक्षातील लोकशाही संपली आहे,’ अशा शब्दांमध्ये सिंह यांनी त्यांच्यावरील कारवाईवर भाष्य केलं.

पंतप्रधान मोदींसह भाजपाचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार ट्विटरवर नावापुढे चौकीदार लावत असताना सिंह यांनी त्यांच्या नावपुढे ऊसूलदार शब्द जोडला आहे. ‘मी क्षत्रिय समाजाचा आहे. दोन गुजराती चोर हिंदी पट्ट्यातील लोकांना गेल्या पाच वर्षांपासून मूर्ख बनवताहेत,’ अशा शब्दांमध्ये सिंह यांनी भाजपा नेतृत्त्वाला लक्ष्य केलं. ‘आमचा उत्तर प्रदेश गुजरातपेक्षा पाचपट मोठा आहे. उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था पाच लाख कोटींची आहे. तर गुजरातची अर्थव्यवस्था १लाख १५ हजार कोटींची आहे. या परिस्थितीत ते खाणार काय आणि काय विकास करणार?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आपण प्रधानमंत्री निवडला आहे की प्रचारमंत्री अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. देशाचा पंतप्रधान टी-शर्ट आणि चहाचे कप विकतो. हे कितपत चांगलं वाटतं?, असा प्रश्न त्यांनी ट्विटमधून विचारला. ‘भाजपानं विचारसरणीतून लोकांच्या मनात स्थान मिळवलं. केवळ टी-शर्ट आणि मिस्ड कॉल देऊन कार्यकर्ते तयार होत नाहीत,’ अशी टीका सिंह यांनी केली. याशिवाय त्यांनी एका ट्विटमध्ये समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांचं कौतुकही केलं आहे. ‘आझमगढमधून अखिलेश यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. यामुळे धर्म आणि जातीचं राजकारण संपेल,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी अखिलेश यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!