पत्नीला कैद केल्याचा जेएनयूच्या कुलगुरुंचा आरोप, विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळले

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) गेल्या आठवडाभरापासून विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण आणि निषेध आंदोलन सुरु आहे. दरम्यान, या आंदोलनाने सोमवारी संध्याकाळी हिंसक रुप धारण केले. विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या घराला घेराव घातला आणि घराच्या काचा फोडल्या. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपल्या पत्नीला घराबाहेर पडू दिले नाही तसेच तिला कोणाशीही संपर्क करण्यास मज्जाव करण्यात आला, अशा प्रकारे तीन तास पत्नीला कैदेत ठेवण्यात आले, असा आरोप कुलगुरु एम. जगदेशकुमार यांनी केला आहे.
कुलगुरु जगदेशकुमार म्हणाले, जेव्हा हिंसक झालेल्या विद्यार्थ्यांनी माझ्या निवासस्थानावर हल्ला केला त्यावेळी मी विद्यापीठाच्या बैठकीत होतो. त्यानंतर जेव्हा मी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराकडे परतलो तेव्हा ४०० ते ५०० विद्यार्थ्यांचा जमाव माझ्या घराभोवती होता. हे विद्यार्थी सुरक्षारक्षांना धक्काबुक्की करीत होते, तसेच त्यांनी कुंपणाचे दार तोडले आणि घराच्या परिसरात प्रवेश केला.
यावेळी माझी पत्नी एकटीच घरात होती. त्यामुळे घराभोवती घोषणाबाजी करणाऱ्या ४००-५०० विद्यार्थ्यांच्या जमावाने घेराव घातलेला असताना त्या एकट्या महिलेची काय अवस्था झाली असेल याचा तु्म्हाल अंदाज आला असेल. माझ्या पत्नीला तब्बल तीन तास घरामध्ये कैद ठेवण्यात आले, असे कुलगुरु जगदेशकुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांचे असं वागणं दुर्देवी आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या हक्कांचा आदर करतो, मात्र जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारे हिंसक वागणे अपेक्षित नाही. एक शिक्षक आणि जेएनयूचा प्रमुख या न्यात्याने मी त्यांना माफ करतो. मात्र, त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असेही पुढे कुलगुरु जगदेशकुमार म्हणाले.
काय आहे प्रकरण ?
जेएनयू मध्ये प्रवेशावरून एससी, एसटी, ओबीसी ना आरक्षण दिले जात नसल्याने हे आंदोलन आठवडाभरापासून चालू आहे.
जेएनयु विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्षा सारिका चौधरी, माजी अध्यक्ष गीता कुमारी, संयुक्त सचिव शुभांशु सिंह, स्कूल ऑफ इंटरनेशनल स्टडीज चे संयोजक आशी घोष, स्कूल ऑफ सोशल साइंस चे संयोजक कृति राय, सीएसआरडी एमफिल प्रथम वर्षाचे विद्यार्थी अखिलेश कुमार व पीएचडी चे प्रथम वर्षाचे विद्यार्थी मयूर कुमार, बीए स्पेनिशचे तीस-या वर्षाची विद्यार्थीनी वात्या रैना, लेबर स्टडीजचे एमए द्वितीय वर्षाचे विद्यार्थी सूर्या प्रकाश यांचा या आंदोलनात सहभाग आहे. त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही अशी या विद्यार्थ्यांची तक्रार आहे.