आता नरेंद्र मोदींनी पाच वर्षात काय केले ते सांगावे : प्रियंका गांधी

काँग्रेसने ७० वर्षांत काय केलं? अशी प्रश्न विचारणारी भाषणे मोदींनी केली. मात्र, या भाषणांचीही एक एक्सपायरी डेट असते त्यामुळे आता मोदींनी पाच वर्षांत काय केलं हे सांगायला हवं, अशा शेलक्या शब्दांत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला. प्रियंका या कालपासून राज्यात तीन दिवसीय प्रचार दौऱ्यावर आहेत. दरम्यान, काल रात्री त्यांनी भदोहीत मुक्काम केला. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रियंका म्हणाल्या, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी जे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केले आहे, ते दिसायला खूपच आकर्षक आहे. मात्र, विकास आणि योजनांबाबतची जमिनीवरची गोष्ट निराळीच आहे. जनता अजूनही कष्टी आहे, मी रोज इथल्या लोकांना भेट देत आहे, त्यांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत.
शेतकरी, मजूर यांच्यासह सर्व वर्गातील लोक अद्याप कष्टी आहेत. यावरुन पाच वर्षांत केंद्र सरकारने जनतेसाठी काय काय केलं, हे आज मला चांगलंच कळलं आहे. मोदींची भाषणं आणि त्यांच्या सरकारची डेटही आता एक्सपायर झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.