सगळ्या “चौकीदारां”शी पंतप्रधान मोदी ३१ मार्चला साधणार संवाद : रविशंकर प्रसाद

“में भी चौकीदार हूं” ची शपथ घेणारे आणि मोहिमेचे समर्थन करणाऱ्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ मार्चला संवाद साधणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी दिली.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी एकाचवेळी देशातील ५०० ठिकाणी संवाद साधणार आहेत. में भी चौकीदार हूं प्रचार मोहिम यशस्वी ठरली असून मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरुन देशातील ५०० ठिकाणी संवाद साधतील असे प्रसाद यांनी सांगितले. “में भी चौकीदार हूं” ही मोहिम आता मोठया चळवळीमध्ये बदलली असून सोशल मीडियावर संपूर्ण दिवस हा जागतिक ट्रेंड होता असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
२० लाख लोकांनी याबद्दल टि्वट केले. नमो अॅप आणि सोशल मीडियावर एक कोटी लोकांनी “में भी चौकीदार हूं” मोहिमेसाठी शपथ घेतली असे रविशंकर प्रसाद म्हणाले. जे कुटुंबासह जामिनावर बाहेर आहेत आणि विविध कायदेशीर कारवायांचा सामना करत आहेत त्यांना “में भी चौकीदार हूं” मोहिमेची अडचण आहे. काही लोक म्हणत आहेत की, चौकीदार श्रीमंतांसाठी असतो. पण हे तेच लोक आहेत ज्यांनी गरीबांचे १२ लाख कोटी रुपये लुटले आणि आता ते बोलत आहेत असे रविशंकर प्रसाद म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारंवार चौकीदार शब्दाचा उल्लेख होत आहे. विरोधक पंतप्रधान मोदींवर चौकीदार चोर हैं असा आरोप करत आहेत तर पंतप्रधान मोदींनी तेच शब्द पकडून “मैं भी चौकीदार हूं” प्रचार मोहिम सुरु केली आहे.