Manohar Parrikar : यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर मिरामार बीच येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला. पर्रिकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. कला अकादमीपासून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पर्रिकर यांची अंत्ययात्रा निघाली.
पर्रिकर यांचे समर्थक, भाजप कार्यकर्ते आणि हजारो नागरिक या अंत्ययात्रेत सहभागी झाले. ‘मनोहर भाई अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर सहा वाजेच्या सुमारास मिरामार बीचवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हवेत बंदुकीच्या २१ फैरी झाडत लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यापूर्वी पणजीतील भाजपच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली.