अखेर अनिल अंबानीकडून एरिक्सनने मिळवले ४६२ कोटी

स्वीडिश टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी असलेल्या एरिक्सनचे ४६२ कोटी रुपयांचे देणे आरकॉम कंपनीने दिल्यामुळे चेअरमन अनिल अंबानी यांची कैद टळली आहे. गेल्या वर्षभरापासून दोन्ही कंपन्यांमध्ये कायदेशीर लढाई सुरू होती. एरिक्सनची थकबाकी भरली नसती, तर अंबानी यांना कारागृहात जावे लागले असते.
एरिक्सन कंपनीच्या वकिलांनी थकबाकी जमा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आत्तापर्यंत आरकॉमने ११८ कोटी रुपये एरिक्सनकडे जमा केले होते. उर्वरित थकबाकी १९ मार्चपर्यंत जमा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. एरिक्सन कंपनीची थकबाकी न देणे आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे जाणूनबुजून पालन करणे, या आरोपांवरून न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी अनिल अंबानी यांना दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत थकबाकी जमा न केल्यास अंबानी यांना कारागृहात जावे लागेल, असा इशारा न्यायालयाकडून देण्यात आला होता.