लोकसभा २०१९ : महाराष्ट्र भगवा केल्याशिवाय राहणार नाही : देवेंद्र फडणवीस

ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे भाजपचे कार्यकर्ते जिवाचं रान करतील तर जिथे भाजपचे उमेदवार आहेत त्याठिकाणी शिवसैनिकांचे बळ उमेदवारांच्या पाठिशी उभे राहिल. त्यामुळे तुम्ही चिंता करु नका, एकजूटीने काम करा असं आवाहन कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिवसेना-भाजप युती अभेद्य आहे, काही जण शिवसेना-भाजप भांडावेत यासाठी देव पाण्यात घालून बसले होते, ही निवडणुकीपूरती नाही. सत्तेसाठी नाही. ही विचारांची युती आहे. म्हणूनच ती टिकली आणि भविष्यातही टिकणार आहे, आम्ही फेविकॉलचा जोड आहोत, आम्ही हिंदुत्ववादी आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत केले.
शिवसेना-भाजप युती जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा अमरावती येथे शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
युतीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवर टीका केली, शिवसेना-भाजपा युतीसमोर आता कोणताच कॅप्टन उभा राहायला तयार नाही. एक माघार घेतो, दुसरा म्हणतो मी उभा राहणार नाही, पत्नी निवडणूक लढवणार असा टोला फडणवीस यांनी शरद पवार यांना नाव न घेता लगावला, तर सत्ता येईल, जाईल. पण देश महत्वाचा आहे गेल्यावेळी ४२ जागा जिंकल्या.तो आपला रेकॉर्ड नव्हता. खरा रेकॉर्ड तर २०१९ मध्ये करायचा आहे. पूर्ण ताकदीने महाराष्ट्राला भगवे केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.