लोकसभा २०१९ : मायावती यांचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय, नागपुरातून सुरू करणार प्रचार

- बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला असून पक्षाच्या प्रचाराचा नारळ त्या नागपुरातून फोडणार आहेत.
समाजवादी पक्ष आणि बसपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या केवळ देशभर दौरे करणार आहेत.
अखिलेश यादव आणि अजित सिंह यांच्या जोडीने मायावती प्रचारसभांना संबोधित करतील. कट्टर विरोधक मुलायम सिंह यादव यांच्यासाठी मैनपुरीत रॅली घेण्याची तयारीही मायावतींनी केली आहे. बसपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सुप्रिमो मायावतींनी निवडणूक न लढवण्याचा आपला निर्णय घोषित केला आहे.
एकट्या उत्तर प्रदेशातच मायावती ३९ सभांचा झंझावात करणार आहेत. विशेष म्हणजे नागपुरातून त्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
गेल्या २५ वर्षांत मायावती आणि मुलायम सिंह यादव यांनी एकमेकांचं तोंडही पाहिलं नसल्याचं म्हणतात. आता अखिलेश यादवांच्या प्रयत्नांनी एकत्र आलेले यूपीतील हे दोन दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे देशभरातील जनतेच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत