मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेचा चीनला इशारा

संयुक्त राष्ट्रात नकाराधिकाराचा वापर करून चीनने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्यापासून वाचवल्या बद्दल अमेरिकेने चीनला कडक शब्दांत इशारा देताना म्हटले आहे कि , चीनच्या अशा धोरणानं संयुक्त राष्ट्रातील इतर सदस्य देशांना इतर पर्यायांचा वापर करावा लागेल. जर चीन दहशतवादासंदर्भात गंभीर असेल, तर त्याने पाकिस्तान आणि इतर देशांतील दहशतवाद्यांचा बचाव करू नये. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले की, चीनने चौथ्यांदा असे केले आहे. चीनने सुरक्षा परिषदेच्या प्रक्रियेत अडचणी आणणे योग्य नाही. चीन असाच वारंवार दहशतवादावर कारवाई करण्यापासून इतर देशांना रोखत राहिल्यास सुरक्षा परिषदेकडे इतर मार्गांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
चीनच्या निर्णयामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर अजहरची एक ऑडियो टेप समोर आली होती. यात भाचा उस्मानच्या हत्येचा बदला घेण्याची सूचना त्यानं दहशतवाद्यांना केली होती. मात्र चीनने संयुक्त राष्ट्रात जैश आणि अजहरचा संबंध नसल्याचा दावा केला. मसूदच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असाही दावा चीनकडून करण्यात आला. या प्रकरणी भारताने मसूदच्या ऑडियो टेप संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला दिल्या. जैश आणि मसूदचे संबंध यामधून स्पष्ट होत होते असे भारताचे म्हणणे होते. अमेरिका या मुद्द्यावर भारताच्या बरोबर असल्याने त्यांनी चीनच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत चीनला कडक शब्दांत इशारा दिला आहे.