नाना पटोलेंच्या उमदेवारीवर काय म्हणाले नितीन गडकरी ?

राजकारणात मी दुश्मनी ठेवत नाही, सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत, नाना पटोलेंनी पक्ष सोडला असला तरी त्यांच्यावर आर्शीवाद कायम राहतील. तसेच निवडणुकीसाठी पटोलेंना शुभेच्छा आहेत असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना केले . नागपूरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेस पक्षाला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल त्याने लढावे , मी जे पाच वर्षात काम केलं, त्याच्याच आधारावर लोकांसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद मागेन असं त्यांनी सांगितलं.
काँग्रेसकडून नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी सध्या खासदार आहेत. या मतदारसंघात प्रामुख्याने दलित मतदारांची संख्या जास्त असल्याने दलितांची मते निर्णायक असतील. त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय या मतदारसंघात येत असल्याने हा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा मानला जातो. गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांना ५ लाख ८७ हजार मते मिळाली होती. काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांचा पराभव या निवडणुकीत झाला होता. विलास मुत्तेमवार यांना ३ लाख ३ हजारे मते मिळाली होती. मागील लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पटोले विजयी झाले होते. मात्र २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया येथे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी विजय मिळवला होता.