बालाकोटच्या “त्या “स्थळांवर माध्यमांना जाण्यास पाक सरकारचा प्रतिबंध

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकची सत्यस्थिती जगासमोर येऊ नये, यासाठी पाकिस्तानकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकच्या ठिकाणी म्हणजेच बालाकोटमध्ये जाण्यापासून माध्यम प्रतिनिधींना मज्जाव करण्यात येत करत असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय हवाई दलाने हल्ला केलेल्या बालाकोट येथील एका टेकडीवरील मदरसा आणि परिसरात असलेल्या इमारतींजवळ मीडियाला जाण्याला पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा आडकाठी करत आहे. गेल्या ९ दिवसांपासून रॉयटर्स या माध्यमाचे प्रतिनिधी बालाकोट येथील त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, जेथे भारतीय हवाई दलाने हल्ला केला होता. सदर इमारत मदरसा असल्याचे सांगण्यात येत असून, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून तो संचालित होता. मदरसा असलेल्या परिसरात माध्यम प्रतिनिधींना फिरकण्यासही पाककडून मनाई करण्यात येत आहे. भारताच्या प्रत्युत्तरानंतर बालाकोटमध्ये पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांची एक टीम तैनात असून, खडा पाहारा देण्यात येत आहे.
भारतीय हवाई दलाच्या या सर्जिकल स्ट्राइकनंतर लगेचच परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी, जैशच्या प्रशिक्षण शिबिरांवर कारवाई केल्याचे सांगत यामध्ये अनेक दहशतवादी, कमांडर मारले गेल्याची माहिती दिली होती.