“पाटिदार” नेते हार्दिक पटेल यांनी घेतला मोठा निर्णय

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल लवकरच काँग्रेसमध्ये सहभागी होत असल्याचे वृत्त असून गुजरातमधील जामनगर लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याचीही शक्यता आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, गुजरातमध्ये पाटीदार समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केलेले पटेल हे १२ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षात सहभागी होण्याची शक्यता आहे.
सध्या जामनगर मतदारसंघाच्या खासदार भाजपाच्या पूनमबेन मादम या आहेत. पटेल अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षात सहभागी होते.
गुजरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृह राज्य असल्याने काँग्रेसने आपले संपूर्ण लक्ष गुजरातवर केंद्रीत केले आहे तर हार्दिक पटेल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपाला कडवी झुंज दिली होती.
दरम्यान, २०१५ मध्ये हार्दिक पटेल हे जेव्हा पाटीदार आंदोलन करत होते. त्यावेळी लोक त्यांच्याकडे एक नवा पर्याय म्हणून पाहत होते. काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांनी आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले होते. पण कोणत्या पक्षाच्या वतीने उभारणार हे त्यांनी सांगितले नव्हते.
पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरुन हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारचा विरोध केला होता. २०१५ मध्ये स्थानिक स्वराज संस्था निवडणुका आणि २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता.