पुलवामा हल्ला : मोदी- इम्रान खान यांची “फिक्सिंग” : काँग्रेस नेत्याच्या आरोपामुळे खळबळ !!

पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फिक्स केला होता असा हा आरोप आहे. काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी हा हल्ला फिक्स होता असे म्हणत खळबळ उडवून दिली आहे. पुलवामा हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. त्यानंतर या हल्ल्याचा देशभरातून निषेध नोंदवण्यात आला. इतकेच नाही तर या हल्ल्यानंतर बरोबर तेराव्या दिवशी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तरही दिले. आता या हल्ल्यावरून राजकारण रंगताना दिसतं आहे. कारण एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवानांच्या शौर्याचं श्रेय लाटत आहेत असा आरोप विरोधक करत आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी छुपी हातमिळवणी केली आहे. या दोघांची हातमिळवणी नसती तर हा हल्ला होऊच शकला नसता असंही हरिप्रसाद यांनी म्हटलं आहे. काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत बी. के. हरिप्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हा गंभीर आरोप केला आहे. बी. के. हरिप्रसाद हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना जेव्हा स्वाईन फ्लूची लागण झाली होती तेव्हा ते रूग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळीही हरिप्रसाद यांनी अमित शाह यांच्या आजारावर बोचरी टीका केली होती. ज्यामुळे सोशल मीडियावर ते ट्रोलही झाले होते.