मोदींच्या खोटे बोलण्याला काही सीमाच राहिलेली नाही, जरा तरी लाज बाळगा : राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने खोटं बोलत आहेत त्यांच्या खोटं बोलण्याला काही सीमाच राहिलेली नाही असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. अमेठी येथील ऑर्डन्स फॅक्टरीचे भूमिपूजन मी स्वतः २०१० मध्ये केले होते. गेल्या काही वर्षांपासून तिथे छोट्या हत्यारांची निर्मिती होते आहे. रविवारी तुम्ही अमेठीत आलात आणि पुन्हा एकदा खोटंच बोललात, तुम्हाला अजिबातच शरम वाटत नाही का? अशा आशयाचा ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. इतकंच नाही तर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली वक्तव्यं कशी खोटी आहेत हे दाखवणारे ट्विट केले आहेत.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही असं मोदी त्यांच्या भाषणात म्हटले होते. ज्यानंतर यूपीएने आकडेवारी देत आम्ही आमच्या कार्यकाळात ४ हजार २३९ दहशतवादी ठार केले तर मोदींच्या काळात ८७६ दहशतवादी ठार झाले असं म्हटलं आहे.
एवढंच नाही तर पहिल्या महिला संरक्षण मंत्री तामिळनाडूच्या आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे असं मोदींनी म्हटलं होतं. हे वक्तव्यही काँग्रेसने खोडून काढलं आहे. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या संरक्षण मंत्री होत्या त्या उत्तर प्रदेशातून होत्या हे मोदी विसरले असावेत असा ट्विट काँग्रेसने केला आहे.
हल्ली जे गंभीर गुन्ह्यातले आरोपी असतात त्यांना ३ दिवस, सात दिवस, ११ दिवस किंवा फार तर महिनाभरात फासावर लटकवले जाते असे मोदींनी म्हटले होते. या वक्तव्याचाही समाचार काँग्रेसने घेतला आहे. देशात शेवटची फाशी 2015 मध्ये झाली होती. एवढंच नाही तर उन्नाव बलात्कार प्रकरणात एका भाजपा आमदाराचा सहभाग होता त्या पीडितेचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत असं काँग्रेसने म्हटलं आहे. मोदी कसे खोटं बोलतात हे सांगणारे ट्विटच काँग्रेसने आकडेवारीसह सादर केले आहेत. आता यासगळ्यावर भाजपा नेते किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.